जुन्या भांडणातून मित्राचा खून करण्याच्या तयारीत असलेले अटकेत

  पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – लोखंडी कट्टे व पिस्तूले बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोन सराईतांना गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन लोखंडी कट्टे व एक पिस्तूल तसेच चार जिवंत काडतुसे असा ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सनी उर्फ सुशांत लालबहाद्दूर बग्गा (१९, कात्रज), अक्षय श्रीकांत आदवडे (२३, सुपर अप्पर इंदीरा नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनीट चारचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी बग्गा व अक्षय आदवडे यांची त्यांच्या मित्रांसोबत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भांडणे झाली असून त्याच्या रागातून त्यांनी उत्तरप्रदेशातून अग्निशस्त्रे व काडतुसे आणली आहेत. तर ते मित्रांचा काटा काढणार आहेत. अशी माहिती पोलीस नाईक रमेश चौधर व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत मिळाली.

त्यानंतर ते दोघे कात्रज येथील पेशवे तलाव येथे येणार असल्याची माहिती शिवतरे व चौधर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळू लागले. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी दोघांना पकडले. त्यानंतर त्यांनी दोघांची झडती घेतल्यावर बग्गा याच्याकडे एक पिस्तूल, एक लोखंडी कट्टा, दोन काडतुसे तर अक्षय आदवडे याच्याकडे एक लोखंडी कट्टा दोन जिवंत काडतुसे असा ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी ते जप्त केले आहेत.

युनीट चारच्या पथकाने या आठवड्यामध्ये एकूण सात पिस्तूले व ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी भालचंद्र बोरकर, शंकर पाटील, सुनील पवार, गणेश साळुंके, रमेश साबळे, शितल शिंदे, सचिन ढवळे, शंकर संपते, रमेश चौधर, निलेश शिवतरे, अतुल मेगे, सतिश वणवे, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली.