अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली 1 कोटीच्या गुटख्याची वाहतूक, सापडले पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक वाहनांनाच फक्त इतर जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत काही लोक अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत होते. अशाच एका ट्रकमधून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे. ट्रकवर अत्यावश्यक सेवा असे लिहून त्यामधून गुटख्याची वाहतूक होत होती. या करावाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून औरंगाबाद शहरात येत असलेला गुटखा झालटा फाटा येथे पकडण्यात आला. याप्रकरणी 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊन असताना दोन महिन्यापासून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री सुरु होती. घरपोच सुविधा सुरु असल्यानं गुटख्याचा हा धंदा मागील आठवड्यात सीसीटीव्हीतच्या माध्यमातून उघड झाला होता.
औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून दररोज गुटखा येत असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. एका ट्रकमध्ये भाजा आणि फळांचे ट्रे ठेवून ही वाहतूक सुरु होती. हा ट्रक पकडल्यानंतर गुटखा कसा शहरात येतो याचे गुढ उकललं आहे.

कर्नाटकमधून सोलापूर अहमदनगर मार्गे बीड बायपास रोडने एक ट्रकमध्ये गुटखा घेऊन येत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड बायपास रोडवरील झालंटा फाटा येथे सापळा रचून पकडले. यावेळी सय्यद अकील सय्यद अयुब आणि शेख रफिक शेख कदिर यांच्या ताब्यातील बंदी असलेला 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.