महिला आयपीएलमधून ‘या’ देशाची EXIT

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा ६ ते ११ या कालावधीत आयोजित केली आहे. पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनर्आखणीबद्दल बीसीसीआय (BCCI) सोबत वाद सुरु असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला आयपीएलमध्ये सहभागी होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मज्जाव केला आहे. तसेच पुरुषांची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात यावी, यासाठी बीसीसीआयवर दडपण आणण्याच्या हेतूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकारी बेलिंडा क्लार्क (माजी कर्णधार) यांनी आयपीएल’मध्ये महिला संघ खेळणार नसल्याचा ई-मेल पाठवला आहे. यावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप बीसीसीआयकडून करण्यात आला आहे.

महिला आयपीएल स्पर्धा सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी या तीन संघांमध्ये खेळली जाणार असून यात भारत व जगातील अव्वल महिला क्रिकेटपटू सहभाग घेणार आहेत. प्रत्येक संघात ४ परदेशी महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

हरमनप्रीत ही सुपरनोव्हाज संघाची , स्मृती ट्रेलब्लेझर्स संघाची तर मिताली राज ही व्हेलॉसिटी संघाची कर्णधार असणार आहे. तसेच डब्ल्यूव्ही रमण हे सुपरनोवा संघाचे, बीजू जॉर्ज ट्रेलब्लेझर्सचे आणि ममता माबेन या वेलोसिटी संघाचे प्रशिक्षक असतील. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील.