अयोध्येत भूमिपूजनाची तयारी पूर्ण, सुरक्षिततेसाठी कडक ‘बंदोबस्त’ !

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याची तयारी पुर्ण झाली असून राम मंदिराचा आणि आसपासचा परिसरही मोठ्या प्रमाणात सजवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. कोरोनाच्या दृष्टीनेही आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या.

राममंदीर भूमीपूजन सोहळयाला सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण 175 जणांना भूमिपूजनाचे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी देशातील विविध भागातील संतांचा समावेश आहे. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोड तयार करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आले होते. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. इक्बाल अन्सारी हे भूमिपूजनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही स्वागत करणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत. अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.