अयोध्या प्रकरण : पाच सदस्यीय घटनापीठासमोर 10 जानेवारीला सुनावणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता अयोध्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 10 जानेवारीला ही सुनावणी होणार असल्याचे समजत आहे. या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामाणा, न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं 4 जानेवारीला म्हटलं होतं की, ‘अयोध्येतील जागेच्या वादाप्रकरणी 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं सुनावलेल्या निकालाविरोधात याचिकांविरोधात नव्या पीठाकडून सुनावणी होईल.’ इतकेच नाही तर,  ‘हे राम जन्मभूमीचं प्रकरण आहे. यावर पुढील आदेश घटनापीठाकडून 10 जानेवारीला देण्यात येईल,’ असं सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी त्यावेळी म्हटलं होतं.
राम जन्मभूमी प्रकरणात 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं निकाल दिला. वादग्रस्त जमीन रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तीन पक्षकारांमध्ये विभागण्यात यावी, असा निर्णय न्यायालयानं दिला होता. या निर्णयाविरोधात 14 याचिका दाखल झाल्या. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घटनापीठाकडून करण्यात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं 29 ऑक्टोबरला स्पष्ट केलं होतं.