विचारांवर श्रद्धा अन् विधानांवर ठाम ! बाळासाहेबांच्या भाषणाच्या व्हिडिओतून फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन (Memorial Day) आहे. त्यानिमित्त भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा एक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. फडणवीस यांनी या व्हिडिओतून सेनेला बदललेल्या भूमिकेची आठवणच करून दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ‘विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम ! : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ असे म्हणत एक व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही वाक्य आहेत. ‘बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्राेत होते. त्यांचे भाषण हे नेहमी सल्ला होते. आपल्याला जे बोलायचे ते खणखणीत मांडायचे. लोकांना पटेल असे बोलायचे, त्यांच्या मनात असेल ते बाळासाहेब बोलायचे. त्यांना कोणी बोलू शकत नव्हते, असे फडणवीस यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

दुसऱ्यांच्या विचाराने स्वत:चे विचार बिघडवू नका, प्रामाणिक राहा, फसवेगिरी आली की संपले सगळे. प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात असला पाहिजे. त्याच बरोबर हिंदुत्व विसरू नका, भारताला वाचवण्यासाठी तुम्हीच पुढे आले पाहिजे, असे बाळासाहेबांचे विधान सांगत फडणवीसांनी सेनेला टोला लगावला आहे. तसंच अमित शहा आणि पक्षाचे इतर नेते यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसा आदर होता, हे व्हिडिओत दाखवले आहे. बाळासाहेब ठाकरे हे विचारांवर आणि विधानांवर ठाम होते, असे म्हणत शिवसेनेला त्यांच्या बदललेल्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.