‘गयारामांना’ तुर्तास काँग्रेसमध्ये प्रवेश नाही : बाळासाहेब थोरात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक जण काँग्रेसला सोडून गेलेत. त्या ठिकाणी नवीन दमदार कार्यकर्ते तयार झाले आहेत. या नवी कार्यकर्त्यांना विचारूनच गयारामांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना पक्षात परतण्याची दारे तुर्तास तरी बंद असल्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात भाजपची सत्ता गेल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ आहेत. वारे फिरले तसे फिरणारे हे नेते संधीसाधू असून पक्षाला फसविणारे असल्याचा टोला राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता पक्षातून बाहेर पडणाऱ्यांना लगावला. दरम्यान, नवीन सरकारमध्ये कोणतेही वाद नाहीत. येत्या दोन दिवसांमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना थोरात बोलत होते.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्यांनाही आता पश्चाताप होत आहे. मात्र, भाजपात गेलेल्या काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांना पक्षात लवकर प्रवेश दिला जाणार नाही. काँग्रेस सोडून गेले आहात तर त्यांना थोडे दिवस तिकडेच राहू द्या असा टोला परतणाऱ्यांना त्यांनी लगावला आहे. पक्षाला सोडून गेल्यानंतर त्या जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय गयारामांना प्रवेश नाही अशी स्पष्ट भूमिका थोरात यांनी घेतली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like