परीक्षेच्या दरम्यान मशिदीवरील ‘लाऊड स्पीकर’ बंद करा, शिवसेनेच्या नेत्यांकडून गृहमंत्र्यांना पत्र

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बारावीच्या बोर्ड परिक्षा सुरु असून बारावीनंतर दहावीच्या परिक्षा सुरु होणार आहेत. परिक्षेच्या काळात मशिदीवरील लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या युवा नेत्याने गृहमंत्र्यांना दिले आहे. नागपूर जिल्ह्याचे युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी ही मागणी निवेदनाद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. परीक्षेच्या काळात कुटुंबामध्ये टीव्ही आणि रेडिओही बंद ठेवतात. असं असताना दिवसातून पाच वेळा नमाज पठण केलं जातं. त्यामुळे त्याच्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मशिदीवरील लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Shivsena
शिवसेनेच्या युवा नेत्याच्या या मागणीमुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत शिवसेना नेत्यांकडून अशी भूमिका घेणं यात काही वेगळं नव्हतं. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकूर यांना देखील या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. विरोधात असताना शिवसेनेने अशी भूमिका अनेकवेळा घेतली होती. मात्र, आता असे वादाचे विषय टाळण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

You might also like