Loksabha : खा. शिरोळे यांनी दिल्या गिरीश बापटांना शुभेच्छा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्यातून तिकीट खासदार अनिल शिरोळे यांना की पालकमंत्री गिरीश बापट यांना मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. उमेदवारी मिळवण्यासाठी दोघेही इच्छुक होते. अशातच पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली असून अनिल शिरोळे यांचे तिकीट मात्र कापले आहे. तिकीट कापल्यानंतरही मनात कोणताही रोष न ठेवता खासदार अनिल शिरोळे यांनी गिरीश बापट यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. यात पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आधीच संकेत दिल्याप्रमाणे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले आहे.

दरम्यान, गिरीश बापट यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याबाबत अनिल शिरोळे यांनी ट्विटही केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “लोकसभा २०१९ साठी भा.ज.पा चे अधिकृत उमेदवार म्हणून नामित झाल्याबद्दल श्री. गिरीश बापट यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! पुणे शहरातील पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत आहे.” असे म्हणत शिरोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनिल शिरोळे आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणतात की, “पुण्यातील अनेक कामे मी केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावली. मात्र, पक्ष काय विचार करतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत आहे. ११ कोटी भाजप कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. त्यामुळे या पुढे ही कार्यकर्त्याच्या वृत्तीने काम करत राहणार.” असे अनिल शिरोळे यांनी म्हणले आहे.