TRP Scam : आगामी 12 आठवड्यांसाठी टीआरपी रेटिंग स्थगित, बार्कचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – न्यूज चॅनल्सच्या टीआरपीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेचा मुद्दा बनला आहे. कथित टीआरपी स्कॅमबाबत अनेकांना लक्ष्य केले जात आहे. अशावेळी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल अर्थात BARC ने मोठा निर्णय घेतला आहे. बीएआरसी बोर्डाने 12 आठवड्यांसाठी रेटिंग्ज जारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी हा घोटाळा समोर आणल्यानंतर यामध्ये रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं समोर आली होती मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हा टीआरपी घोटाळा समोर आणला होता.

यामध्ये रिपब्लिक टीव्हीनं अधिक टीआरपी मिळवण्यासाठी काही जणांना पैसे दिले, असा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. त्याचबरोबर या प्रकरणात मराठी वृत्तवाहिनीच्या दोन मालकांना देखील अटक करण्यात आली होती. प्रेक्षकांना कोणते कार्यक्रम आवडतात, कुठल्या वाहिन्या कोणत्या वेळी किती कालावधीसाठी पाहिल्या जातात, याची माहिती टीआरपीमधून मिळते. टीआरपी मोजण्याचं काम बार्क करतं. त्यासाठी काही प्रेक्षकांच्या घरी एक मीटर लावलेले असतात.

मात्र याच मीटरसोबत छेडछाड करण्यात आली. यामध्ये ज्या प्रेक्षकांच्या घरी हे मीटर लावण्यात आले होते त्यांना पैसे देऊन हे चॅनेल पाहण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अखेर बार्कने हा महत्त्वाचा निर्णय घेत १२ आठवड्यांसाठी रेटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं बार्कच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र बार्कनं हा निर्णय घेताना एनबीएशी सल्लामसलत करायला हवी होती, असं एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मांनी म्हटलं आहे.

टीआरपीनुसार जाहिरातीचा दर
टीआरपी या वृत्तवाहिन्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वाहिनीचा टीआरपी अधिक असेल त्या वहिनीला जास्त जाहिराती मिळतात. बीएआरसी या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेनी दिलेल्या अहवालानुसार या रिपब्लिक चॅनलच्या रेटिंगमध्येही वाढ दिसली आहे. त्यामुळे या चॅनलचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिपब्लीक चॅनलचे संचालक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनाही समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि आजच हे समन्स जारी केले जाणार आहे.त्यामुळे आता या वाहिनीच्या इतर संचालकांना देखील चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

हंसा नावाच्या संस्थेच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक केल्यानंतर…
हंसा नावाच्या या संस्थेला टीव्हीला बॅरोमिटर लावायचं काम दिलं होतं. हे मिटर लावतानाची जी काही माहिती असते ती गुप्त ठेवली जात असते. मात्र, काही ठिकाणी पैसे देऊन हे मिटर लावले जात असल्याचा आणि एक प्रकारचं रॅकेट यात काम करत असल्याची हंसाच्या एका माजी कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्याची चौकशी केली असता त्याच्या खात्यात २० लाख रुपये आढळून आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा टीआरपी घोटाळा आढळून आला. पोलिसांकडे देखील या प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.

काही चॅनलच्या टीआरपीमध्ये अचानक वाढ झाली होती.
या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वृत्तवाहिन्यांचा टीआरपी अचानक वाढला होता. अनेक ठिकाणी हे मीटर बसवण्यात आले होते. ज्या भागांत अत्यंत गरीब लोकं राहतात किंवा जिथे झोपडपट्टीसारखी वस्ती आहे. त्या भागांत असे मिटर लावण्यात आले आणि त्या ठिकाणच्या लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल पाहायला लावले जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना ही गोष्टी आढळून आली गुरूवारीच बार्क या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेचे देशभरातल्या चॅनलचे आकडे जाहीर केले जातात. त्यामुळे आजचाच दिवस निवडण्यात आला आहे.