राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टमुळे बीड जिल्हयात राजकीय भुकंप !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान सभेतील विधिमंडळ गट उपनेते तसेच माजी मंत्री जयदत्‍त क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवर ‘लढा’ अशी पोस्ट टाकल्याने बीड जिल्हयाच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची दाट शक्यता आहे. आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभुषण क्षीरसागर यांनी त्यांची भुमिका ठरविण्यासाठी उद्या (शुक्रवार) जिल्हयाभरातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. बैठकीनंतर आ. क्षीरसागर हे काय भुमिका घेणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्यातरी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे राजकिय चर्चेला उधाण आले आहे.

आ. क्षीरसागर यांनी त्यांच्या पेजवर ‘लढा’ अशी पोस्ट टाकुन त्यांची भुमिका ही निर्णायक असल्याचे संकेत दिले आहेत. या पोस्टमुळे आ. क्षीरसागर यांची नेमकी भुमिका काय याबाबत तर्क-विर्तक काढले जात आहेत. सध्या क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपशी जास्त जवळीक साधुन आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभुषण क्षीरसागर हे राष्ट्रवादीपासुन काहीसे दूर गेल्याचे पहावयास मिळाले होते. आ. क्षीरसागर यांनी भाजपच्या गोटात एक वेगळ स्थान निर्माण केल्याचे देखील मागे बीडमध्ये झालेल्या अनेक कार्यक्रमांमधुन दिसुन आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने एकीकडे आ. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या मागे पुर्ण ताकत लावली आहे. त्याचवेळी आ. क्षीरसागर यांनी फेसबुक पेजवर ‘लढा’ अशी पोस्ट टाकल्यानंतर जिल्हयात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

आ. क्षीरसागर यांनी जिल्हयातील कार्यकर्त्यांची उद्या बीड येथील आर्शिवाद लॉन येथे बैठक आयोजित केलेली आहे. बैठकीनंतर आ. क्षीरसागर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेसबुकवर ‘लढा’ अशी पोस्ट टाकल्याने लढा नेमका कोणासोबत आहे याबाबत तर्क-विर्तक काढले जात आहेत. आ. क्षीरसागर यांच्या पोस्टमुळे जिल्हयात राजकिय भूकंप येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.