खटोड प्रतिष्ठानतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना संत तरुणसागर महाराज सेवा गौरव पुरस्कार जाहीर

मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचा गौरव

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी मागील दोन वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालय व या रुग्णालयाच्या अधिनस्त रुग्णालयांमध्ये राबवलेले विविध उपक्रम व त्यास मिळालेले यश या सेवेचा गौरव म्हणून बीड येथील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.अशोक थोरात यांना ‘संत तरुणसागर महाराज सेवा गौरव पुरस्कार जाहीर’ करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, 1 लाख रुपये व शाल, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार असून येत्या 5 जानेवारीला कीर्तन महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हे 2017 मध्ये रुजू झाले. या दरम्यान जिल्ह्यात मुलींचा कमी असलेला जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जिल्हा रुग्णालयात प्रसुतीनंतर जन्माला आलेल्या मुलींचा जन्मोत्सव करण्यासाठी मातेसह मुलीचा सत्कार हा उपक्रम राबवला जात आहे. तसेच पंतप्रधान मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी डॉ.थोरात व त्यांच्या टिमकडून केली जात आहे. या माध्यमातून गर्भावस्था ते प्रसुतीदरम्यानच्या काळात मातांना तीन टप्प्यात सहा हजाराचे अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयातही चांगल्या पध्दतीने उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी कसोशीने काम केले.त्यामुळे आता शासकीय रुग्णालयात प्रसुतीचा टक्का वाढू लागला आहे. याबरोबरच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानही प्रभावीपणे राबवले जात असून प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची तपासणी, समुपदेशन व उपचार तज्ञ स्त्रीरोग तज्ञांकडून केले जातात. यामध्ये खासगी डॉक्टरही सहभागी होतात.

जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करताना मोतीबिंदू व कुटूंब कल्याण शस्त्रक्रियांमध्येही जिल्हा रुग्णालयाला राज्यात प्रथमस्थानी आणण्याचे काम डॉ. थोरात यांनी केले आहे. लोकसहभागातून जिल्हा रुग्णालयाला मोठा निधी मिळवून देण्यातही त्यांचा पुढाकार राहिला. या निधी जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन, आयसीयू कक्षात बेड, गाद्या उपलब्ध करुन रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर रुग्णालयातही सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. डॉ.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील केज तालुक्यात सध्या शस्त्रक्रिया मुक्त गाव अभियान राबवले जात आहे. या माध्यमातून आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी तालुक्यातील एका गावाला वैद्यकीय तज्ञांची टिम भेट देवून रुग्णांची तपासणी करते. ज्यांना गरज आहे, त्यांच्यावर उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जातात. सर्व रोग निदानाबरोबरच शस्त्रक्रिया करुन एकही गरजवंत रुग्ण शस्त्रक्रियेविना राहू नये याकडे लक्ष दिले जात आहे.

या सार्‍या सेवाकार्याचा गौरव म्हणून खटोड प्रतिष्ठानच्या वतीने येत्या 5 जानेवारीला कीर्तन महोत्सवात 802 कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचा ‘संत तरुणसागर महाराज सेवा गौरव पुरस्कार’ देवून गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी बीडकरांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, संयोजक राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, सचिव सुशील खटोड व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/