Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं रेडलाईट एरिया बंद, 300 पेक्षा जास्त वारांगणांकडून घेतली जातेय ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये, हॉटेल, मॉल, जीमसह अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही बंद केले आहे. त्याचसोबत आता कोरोनामुळे रेडलाईट भागात काम करणार्‍या वीरांगणा यांनाही दणका बसला आहे. पुण्यातील बुधवार पेठेसह राज्यातील काही ठिकाणी रेड लाईटमध्ये काम करणार्‍या महिलांना व्यवसाय बंद करावा लागला आहे.

कोरोनामुळे भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट एरियामधील 300 हून अधिक वारांगणांनी देहविक्रीचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरुन येणार्‍या व्यक्तीसाठी या परिसरात बंदी घातलण्यात आली आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सरकारने विशेष उपाययोजना केल्या आहेत. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्यातील अनेक समाजसेवी संस्थाही सरसावल्या आहेत. यात हातभार लावण्यासाठी शहरातील हनुमान टेकडी येथील रेडलाईट परिसरातील देहविक्रीचा व्यवसाय करणार्‍या 300 हून अधिक महिला पुढे आल्या आहेत. या महिलांनीही कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे.

येथील महिलांच्या मुलांसाठी बाळ संगोपन केंद्र चालविणार्‍या डॉ. स्वाती खान यांनी या ठिकाणी महिलांची सभा घेऊन व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. कोरोना व्हायरस स्पर्शाने पसरत असल्याने महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील नागरिक घाबरले आहेत. त्यामुळे आम्हाला सुध्दा आमच्या आरोग्याची काळजी आहे. आम्ही पुढील तीन दिवस व्यवसाय बंद ठेवून बाहेरील व्यक्तीस या परिसरात येऊ देणार नसल्याची माहिती येथील वारांगणांनी दिली आहे.