आघाडीचे निंबाळकर, शिवसेनेचे पाटील व अपक्ष पिंगळे यांच्यामध्ये अस्तित्वाची लढत सुरू

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजय निंबाळकर, शिवसेनेचे कैलास पाटील व अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांच्यामध्ये अस्तित्वाची लढत सुरू आहे. कळंब तालुक्यात पिंगळे तर उस्मानाबाद तालुक्यात सेनेचे पाटील व राष्ट्रवादीचे निंबाळकर यांनी गाठी-भेटीवर व कॉर्नरसभांवर भर दिला आहे. एकमेकांच्या पक्षांतरासह आजवरच्या विकासकामांच्या मुद्दावर कॉर्नरसभेत उमेदवार आगपाखड करीत असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीतून राष्ट्रवादीत पक्षांतर करून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झालेले आघाडीचे उमेदवार संजय निंबाळकर यांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांच्यामुळे मोठा आधार मिळाला आहे. दोन्ही संजय एकमेकांचे सच्चे मित्र असल्याने यापूर्वी वेगवेगळ्या पक्षात राहूनही त्यांनी आपले मैत्रीसंबंध कायम ठेवले आहेत. मित्राला आमदार करण्यासाठी दूधगावकर यांनी गावागावात प्रचार सुरू केला असून उमेदवार निंबाळकर हेही मतदारसंघातील विविध गावांना भेटी देवून मतदारांच्या गाठीभेटी घेवून प्रचारकार्य करीत आहेत. राष्ट्रवादीचे निंबाळकर यांनी शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील व अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळविले आहे.

दुसरीकडे सेनेचे कैलास पाटील यांना प्रचारात गटबाजीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खासदार ओम राजेनिंबाळकर यांनीही पाटील यांच्या विजयासाठी नाराज शिवसैनिकांची मनधरणी व कॉर्नरसभांवर भर दिला आहे. उमेदवार पाटील यांनी निंबाळकर आणि बंडखोर उमेदवार पिंगळे यांना आमदारकीपासून रोखण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. मात्र या मतदार संघातील चुरस दिवसेंदिवस वाढतच चालली असून कोण कोणाला हरवणार, हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे.

Visit : Policenama.com