उस्मानाबाद : उमेदवार आणि पक्षाच्या घोषणाबाजीनं चारही मतदारसंघ दणाणून गेले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जाहीर प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. दिवसभर जिल्ह्यातील चारीही विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवारांनी पदयात्रांवर प्रामुख्याने भर दिला. आपापल्या पक्षाचे झेंडे घेवून उमेदवारांनी प्रमुख शहरांमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने पदयात्रा काढली. उमेदवार आणि पक्षाच्या घोषणाबाजीने चारही मतदारसंघ दणाणून गेले होते.

राज्याचे लक्ष लागलेल्या तुळजापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने रॅली काढली. यावेळी पाटील यांच्या समवेत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. अनिल काळे, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांनीही तुळजापूर शहरात आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढली. यावेळी पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे भवानी रोड, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, बसस्थानक, हडको, लोहीया मंगल कार्यालय, लातूर रोडने काढण्यात आली. हजारो महिला, तरुण व नागरीकांनी या पदयात्रेत सहभागी होऊन जल्लोष केला.

उस्मानाबाद शहरात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अजित पिंगळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत अनेकांचे लक्ष वेधले. शिवसेनेच्या पदयात्रेपेक्षा मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजित पिंगळे यांच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही शहरातून मोठे शक्तीप्रदर्शन केले. दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यावरून विविध पक्षांचे झेंडे आणि गमजे घातलेले कार्यकर्ते घोषणाबाजी करीत फिरत होते. सेनेचे बंडखोर पिंगळे यांच्या गर्दीची चर्चा मात्र सगळीकडे मोठ्या उत्सुकतेने चर्चिली जात होती.

उमरगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिलीप भालेराव यांनी ठिकठिकाणी गाठीभेटीवर जोर दिला. तर सेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ तरूणांनी दुचाकी रॅली काढून मतदारांना आवाहन केले. परंड्यात महायुतीचे अधिकृत उमेदवार तानाजी सावंत यांंनी परंडा शहरासह भूम शहरात हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने रॅली काढण्यात आली. शहरवासीयांनी जल्लोषात स्वागत केले. रॅलीत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्यासमवेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, रिपाइंचे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, शिवसेना नेते महादेव अंधारे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, सुभाषसिंह सद्दीवाल, भूम शहरातील रॅलीत उमेदवार तानाजी सावंत यांच्या समवेत भाजपा नेते संजय गाढवे, भैरवनाथ कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत, संचालक किरण सावंत तसेच शिवसेना भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

यावेळी शहरवासियांकडून प्रा. सावंत यांचे जागोजागी जल्लोषात स्वागत झाले. यावेळी प्रा. सावंत यांनी मतदारांशी संवाद साधला. रॅलीनंतर महायुतीचे तानाजी सावंत यांनी भव्य महिला मेळाव्याला सविस्तर संबोधन केले. यावेळी महिला मेळाव्यास विक्रमी गर्दी होती. महिलांनी  यावेळी सावंत यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवल्याचे चित्र होते. सावंत यांनी पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केले तर राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी रॅली व पदयात्रा काढून मतदारांना प्रभावित करण्यासाठी ना-ना क्लृप्त्या अवलंबिल्या.

Visit : Policenama.com