पुन्हा 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, मुंबई जवळच्या ‘या’ शहराने घेतला निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या अगोदर राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच केंद्र सरकारने देखील नंतर लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनचे चार टप्पे पार केल्यानंतरही देशात कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. पण लॉकडाऊनमुळे देशाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच रस्त्यावरील गर्दी आधीसारखी वाढू लागली.

परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. म्हणूनच आता राज्यातील काही शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जात आहे. वसई-विरार शहराने लॉकडाऊनची घोषणा केली असून आता अंबरनाथ शहरातही लॉकडाऊन लागू केले जाणार आहे. अंबरनाथ शहरात ८ दिवस कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले असून दूध, फळे, पालेभाज्या यांची होम डिलिव्हरी होईल आणि दवाखाने, मेडिकल्स सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा लॉकडाऊन २३ जून पासून ३० जूनपर्यंत असणार आहे.

वसई-विरारमध्येही लॉकडाऊन
अंबरनाथ शहरात लॉकडाऊन होण्याअगोदर वसई-विरारमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली होती. येथे ५ प्रभाग समित्यांमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला गेला आहे. वसई-विरारमध्ये कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढत चालला असल्याने पालिकेने त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ही कठोर पावले उचलली आहेत. महापालिकेने सर्वेक्षण करुन सर्वाधिक रूग्ण आणि मृत व्यक्ती आढळलेला परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार १८ जूनपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.