CAA वरून नितीश कुमारांचं टीकास्त्र, म्हणाले – ‘कुणामध्येही इतका दम नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (bihar-assembly-election) दोन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सवर्च नेत्यांनी आता तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारात नितीश कुमार यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयींच्या अफवांवरून टीका केली आहे.

मुस्लिमबहुल भाग असलेल्या किशनगंजमध्ये नितीश कुमार यांची सभा झाली. या सभेत त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर टीका केली. नितीश कुमार म्हणाले, हा चुकीचा प्रचार कोण करत आहे. उगाच बडबड करतात. कोण कुणाला देशाबाहेर काढणार? सर्व भारताचे नागरिक आहेत. कुणामध्ये दम नाही की आपल्या माणसांना देशाबाहेर (who-will-send-anyone-out-of-country) काढू शकेल. जेव्हापासून जनतेने संधी दिली, तेव्हापासून समाजात प्रेम, बंधूभाव आणि सद्भावनापूर्ण वातावरण निर्माण केले आहे. सगळ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही केला, करत असतो. समाजात वाद चालूच राहावेत असे काही लोकांची इच्छा आहे. आमचा उद्देश हाच आहे की, सर्वजण प्रेमाने राहावेत. तेव्हाच समाज पुढे जाईल, असे सांगत नितीश कुमार यांनी सीएएवरून गैरसमज निर्माण करणाऱ्यांवर निशाणा साधला.

नितीश कुमार यांनी सीएएवरून टीका करताना कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत बांगलादेश व पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढू, असे विधान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी ही टीका केल्याचं बोललं जात आहे.