बिहार पोलिसांनी गाठलं ‘या’ दिग्दर्शकाचं घर, ‘सुशांत-रिया’च्या नात्याबद्दल केलं होतं वक्तव्य !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या रॉम कॉम सिनेमाचा डायरेक्टर रूमी जाफरी यानं काही दिवसांपूर्वीच रिया आणि सुशांत यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत असलेल्या आणि मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांनी रूमीचं मुंबईचं घर गाठलं.

सुशांतच्या निधनानंतर लोक जेव्हा सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला ट्रोल करत होते तेव्हा रूमी जाफरीनं रियाची बाजूत घेत सुशांतच्या निधनासाठी रियाला जबाबदार धरणाऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. रूमीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असा सवालही केला होता की, रिया चक्रवर्ती किंवा या प्रकरणाशी संबंधित एखाद्या सेलिब्रिटीला काही झालं तर याला जबाबदार कोण असेल ?

सुशांत आणि रिया चक्रवर्ती एका रोमँटीक कॉमेडी सिनेमात काम करणार होते. या सिनेमाचं डायरेक्शन रूमी जाफरी करणार होता. दोघंही या प्रोजेक्टबद्दल खुश होते आणि पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. परंतु त्याआधीच सुशांतनं आत्महत्या केली असंही रूमी म्हणाला होता.

या सगळ्यानंतर आता बिहार पोलिसांनी रूमीचं मुंबईतील घर गाठलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून अनेक मोठे खुलासे होताना दिसत आहेत.