लॉकडाऊनमध्ये दुकान उघडले, पोलिसांनी जमिनीवर आपटून केली बेदम मारहाण !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. बिहारमधील लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे दिसून आले आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाऊन असताना एका व्यक्तीने रविवारी दुकान उघडल्याने त्याला दोन पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

व्हिडीओ मुझफ्फरपूरच्या बरुराज पोलिस स्टेशन परिसरातील फुलवारिया चौकातील असल्याचे सांगितले जात आहे. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव सुरेंद्र आहे. शहरात लॉकडाऊनची घोषणा केली असतानाही या तरुणाने दुकाने उघडल्यामुळे बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रला जमिनीवर आपटून मारहाण केली. पोलिसांना पाहून बरेच लोक पळून गेले पण दोन दुकानदार पकडले गेले. यावेळी एकाने स्वत: ला पोलिसांच्या स्वाधीन केले परंतु सुरेंद्र यांनी दुकान उघडण्यासाठी साफसफाई सुरू केली. त्यावेळी संतापलेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.