गांधी जयंतीला तुरुंगातून बाहेर येताच केला दोघांचा खून

औरंगाबाद (बिहार) : वृत्तसंस्था – यंदा गांधी जयंतीनिमित्त बिहारमधील तुरुंगामधून जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आलेले किंवा २० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या ३४ आरोपींची चांगल्या वर्तवणुकीमुळे सुटका करण्यात आली. या सर्वांमध्ये शास्त्रास्त्र काद्यामध्ये सात वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या २७ वर्षीय युवकाची सुटका झाली. मात्र, याच आरोपीने तुरुंगाबाहेर पडल्यानंतर अवघ्या दीड महिन्यांमध्ये दोन जणांचा खून केला. विशेष म्हणजे या आरोपीवर इतर प्रकरणांमध्ये कोर्टात खटले सुरु असतनाही त्याला चांगल्या वागणुकीचा दाखला देत सोडून देण्यात आल्याने बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक पोलीस अधिकारी अडचणीत सापडले आहेत.

शस्त्रास्त्र कायदा, खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या २७ वर्षांच्या पवनकुमार सिंग या आरोपीला चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी मुक्त केले होते. मात्र पवनकुमार सिंग याने तुरुंगाबाहेर पडल्यानंतर दोन जणांचा खून केला. याच हत्येप्रकरणी पुन्हा पोलिसांना त्याला अटक केली असून आता पोलिसांवरच चौकशीची टांगती तलवार आहे.

पवनकुमार सिंग या आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील नाबीनगर पोलीस स्थानकांच्या हद्दीमध्ये राहतो. चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करुन त्याला मुक्त करण्यात आले. मात्र बाहेर आल्यानंतर पवनकुमार याला पत्नीचे संबंध आपल्या बरोबर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मोहम्मद शफिकबरोबर असल्याचे समजले. त्यामुळे त्याने शफिकचा काटा काढण्याचे ठरवले. ४ नोव्हेंबर रोजी पवनने शफिक आणि त्याचा चुलत भाऊ मोहम्मद गादी यांना एका निर्जनस्थळी गाठले. आपल्याकडील बंदूकीमधून गोळीबार करुन शफिकला जागीच ठार केले. तर मोहम्मद गादीला जखमी करुन तो जवळच्या तळ्याजवळ घेऊन गेला. त्यानंतर त्याने मोहम्मद गादीला तलावात बुडवून मारले. या दुहेरी हत्यांबद्दल पोलिसांकडे आधी कोणताच पुरवा नव्हता. मात्र शफिकच्या मोबाइलमध्ये पवनच्या पत्नीचा मोबाइल क्रमांक सापडल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. तपासामध्ये दोन्ही हत्या पवनने केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला १८ नोव्हेंबर रोजी अटक केली आणि पुन्हा त्याच तुरुंगात त्याची रवानगी झाली. जेथून दीड महिन्यापूर्वीच चांगल्या वागणुकीसाठी त्याची सुटका करण्यात आली होती.

प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणामध्ये पवनची सुटका करताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आले आहे. चांगल्या वागणुकीसाठी एखाद्या कैद्याची नियोजित काळाच्या शिक्षेअधी सुटका करताना त्या कैद्याने केलेला गुन्हा, त्याचे वय, त्याची तुरुंगातील वागणूक, तो किती काळ तुरुंगात आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. तसेच कोर्टात खटला सुरु असणाऱ्या आरोपीची या नियमांअंतर्गत सुटका करता येत नाही. असे असतानाही पवनची सुटका करण्यात आल्याने आता पोलिसांवरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.