नाव उलटून १० जणांचा बुडून मृत्यू, बिहारमधील गोपालगंजमधील घटना

गोपालगंज : वृत्तसंस्था – बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात नदीत नाव उलटून झालेल्या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एका महिलेसह चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. छोट्या होडीत क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गोपालगंज जिल्ह्यातील गंडक नदीमध्ये मेहंदिया गावाजवळ ही दुर्घटना घडली. एका छोट्या होडीत दोन डझनहून अधिक जण बसले होते. होडीच्या क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याने नदीच्या मध्यभागी ती गेल्यावर पाणी त्यात शिरले व होडी उलटली. त्यातील काही जण पोहून किनार्‍यावर आले व त्यांनी ही घटना इतरांना सांगितली.

हे सर्व जण नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावरील शेतीत काम करण्यासाठी जात होते. नदीत बुडणार्‍यांमध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीत बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.