भरधाव ट्रेनसमोर सुरू होता तरुणांचा ‘स्टंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी अनेक स्टंट केले जातात. अनेकदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात याची कल्पना असतानाही तरुणांकडून खबरदारी घेतली जात नाही. स्टंटबाजीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो.

व्हिडीओमध्ये नदीत उडी मारण्यासाठी तरुण या रेल्वेच्या पुलावर उभी आहेत. ट्रेनचा भोंगा वाजला आणि ती जवळ आली की नदीमध्ये उडी मारायची असा या तरुणांचा खेळ आहे. जीव धोक्यात घालून हे स्टंट मजेसाठी केले जात आहेत. 52 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हा खेळ सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळावर उभे राहू नये यासाठी आवाहन करण्यात येते. .तरीही अशा प्रकारे तरुण मुले ऐकत नसल्याचे दिसून आले आहे. ट्रेन येत असताना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून नदीत पोहोण्यासाठी उडी घेणे म्हणजे जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. हे माहीत असतानाही अशा प्रकारचे खेळ केले जात आहेत. नदीकिनारी काही लोक हे स्टंट कॅमेर्‍यात कैद करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आली नाही. दरम्यान हा व्हिडीओ बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.