आसाराम बापूच्या ‘लीला’ आता मोठ्या पडद्यावर येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बायोपिकच्या सध्या सुरु असणाऱ्या ट्रेंडमध्ये आता एक वादग्रस्त नाव सामील होणार असल्याचे दिसत आहे. कारण लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित बाबा आसाराम बापू यांच्या जीवनावर बायोपिक बनत आहे. गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाऊफॉल ऑफ आसाराम बापू या पत्रकार उशीनर मजूमदार यांच्या पुस्तकावर आधारीत हे बायोपिक असणार आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते सुनील बोहरा हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

सुनील बोहरा यांनी नुकतेच या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “या पुस्कातून आसाराम यांच्या जीवनातील अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मी खूपच प्रभावित झालो आहे. लैंगिक अत्याचाराचा खटला आणि त्यासंदर्भातील अनेक लोकांनी हा सिनेमा बनवण्यासाठी मला प्रेरीत केले.”

सुनील बोहरा लवकरच या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु करणार आहेत. त्यानंतर सिनेमातील कलाकार निश्चित केले जाणार आहेत. सिनील बोहरा यांनी याआधी गँग्ज ऑफ वासेपूर, तनु वेड्स मनु, शाहिद आणि द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दरम्यान आसाराम बापू यांचा मुलगाही लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरला आहे. आज त्याला शिक्षेची सुनावणी होणार आहे.