तुमच्याकडं एकापेक्षा जास्त PAN Card तर नाही ना ? अन्यथा भरावा लागू शकतो मोठा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पॅन कार्ड हे सर्वात महत्वाचे आर्थिक ओळखपत्र आहे. देशाचे आयकर विभाग 10 अंकांचा अल्फा-न्यूमेरिक नंबर जारी करते. कोणत्याही भारतीय करदात्याला याची आवश्यकता पडते. तसेच काही विशिष्ट रकमेवर व्यवहार किंवा खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. दरम्यान, देशात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहेत. प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅनकार्ड घेण्यास परवानगी नाही. काही लोक सिबिल खराब झाल्यास मुद्दाम नवीन पॅनकार्यासाठी अर्ज करतात. त्याच वेळी, काही लोक कर जबाबदार्‍या कमी करण्यासाठी नवीन पॅन कार्ड बनवतात.

त्याचप्रमाणे काही लोक नकळत एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवतात. उदाहरणार्थ, पॅनकार्ड हरवल्यास काही जण डुप्लिकेटसाठी अर्ज करण्याऐवजी नवीन कार्डसाठी अर्ज करतात आणि नवीन कार्ड बनवितात. काही स्त्रिया लग्नानंतर नवीन नाव किंवा आडनाव बदलण्यासाठी नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करतात. दरम्यन, कारण काहीही असो, एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे बेकायदेशीर आहे आणि आयकर विभाग आपल्यावर 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारू शकतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139A (7) अन्वये, ज्याला आधीपासूनच पॅन वाटप केले गेले आहे, तो नवीन स्थायी खाते क्रमांकासाठी अर्ज करू शकत नाही आणि एकापेक्षा जास्त पॅन कार्ड घेऊ शकत नाही.

त्याचबरोबर आयकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत कलम 139A चे पालन न करणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आता अशा परिस्थितीत बर्‍याच लोकांच्या मनात असा प्रश्न पडेल की त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर त्यांनी काय करावे? अशा परिस्थितीत जर आपल्याला आयकर विभागाने लादलेला दंड टाळायचा असेल तर आपण दोन्ही पॅनकार्डांपैकी कोणतेही एक कार्ड सरेंडर करावे. आपण ऑनलाईन किंवा मॅन्युअल फॉर्मद्वारे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करू शकता.