Coronavirus : ‘नोटा’ आणि ‘कॉइन्स’ला ‘स्पर्श’ करताय का ? बँक असोसिएशननं लोकांना दिला ‘हा’ गंभीर इशारा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नोटांना स्पर्श करून किंवा मोजल्यानंतर हात धुण्याचे आवाहन केले आहे. आयबीएने लोकांना व्यवहारासाठी ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगचा अवलंब करण्यास सांगितले आहे आणि बँक शाखांमध्ये जाण्याचे टाळण्यास सांगितले आहे. आयबीएने जाहीर नोटीस बजावली आहे की, ‘चलनात किंवा आधार सक्षम पेमेंट सिस्टमला स्पर्श केल्यानंतर किमान 20 सेकंद साबणाने आपले हात धुवा.’ बँकिंग असोसिएशनने ‘कोरोनासे डरो ना, डिजिटल करो ना’ या नावाने मोहीम सुरू केली आहे. असोसिएशन या मोहिमेद्वारे पैसे भरण्यासाठी नोट किंवा नाण्याऐवजी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्यास लोकांना प्रोत्साहित करीत आहे.

आयबीएने असे आश्वासन दिले आहे की, त्यांचे सदस्य बँक कोणत्याही अडथळ्याशिवाय बँकिंग सेवा सुरू ठेवतील. असोसिएशनने ग्राहकांना जास्त गरज असल्यास बँकेच्या शाखेत जाण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ‘आपण ज्या आव्हानांना सामोरे जात आहात त्याच प्रकारचे आव्हान आमच्या कर्मचार्‍यांना देखील आहे. आम्ही तुम्हाला मदतीसाठी आग्रह करीत आहोत.’

आयबीएने म्हटले आहे की, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि आरटीजीएस आणि एनईएफटी सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट पर्यायांचा उपयोग संकटाच्या या घडीमध्ये करता येईल. असोसिएशनने म्हटले आहे की, ‘आम्ही डिजिटल चॅनेल्स अपडेट ठेवण्यासाठी सातत्याने काम करत आहोत.’ बँकांनी कर्ज देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे आवाहनही आयबीएने केले आहे.

उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत कर्फ्यू लागू केला आहे. यावेळी लोकांना घरात राहण्यास सांगितले गेले आहे. जवळपास सर्वच बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, रेल्वेने 31 मार्चपर्यंत प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.