जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये रिलायन्सच्या मुकेश अंबानींचा समावेश, जाणून घ्या एकुण किती संपत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत सहभागी झाले आहेत. कंपनीची डिजिटल विंग म्हणजे जीओ प्लॅटफॉर्मसमध्ये अलिकडे झालेली मोठी जागतिक गुंतवणूक आणि कंपनीच्या शेयरचा भाव विक्रमी स्तरावर गेल्याने अंबानी यांच्या संपत्तीत लक्षवेधक वाढ झालेली दिसून येत आहे.

अंबानी फोर्ब्सच्या अरबपतींच्या रियल टाईम लिस्टमध्ये 9 व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलिनरी इन्डेक्समध्ये सुद्धा ते नवव्या स्थानावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेयरची किंमत शुक्रवारी 1788 रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहचले होते. जियो प्लॅटफॉर्मसमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे 63 वर्षीय मुकेश अंबानी यांची एकुण संपत्ती साडे 64 अरब डॉलरच्या जवळ पोहचली आहे.

फोर्ब्सच्या प्रमुख दहा कुबेरांच्या यादीत अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्याजवळ सुमारे 160 अरब डॉलरची संपत्ती आहे. यानंतर मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांचे स्थान येते. गेट्स यांच्याजवळ 108.7 अरब डॉलरची संपत्ती आहे. फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट आणि त्यांचे कुटुंब या यादीत तिसर्‍या स्थानावर आहे. त्यांच्याजवळ 103.2 अरब डॉलरची संपत्ती आहे.

फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 87.9 अरब डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. झुकरबर्ग प्रमुख 10 श्रीमंतांच्या यादीतील सर्वात कमी वय असणारे व्यक्ती आहेत. झुकरबर्ग यांचे वय अवघे 36 वर्ष आहे. याच यादीत वॉरेन बफेट पाचव्या स्थानावर आहेत. बफेट यांची एकुण संपत्ती 71.4 अरब डॉलर आहे.

जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेरिकेचा दबदबा आहे. प्रमुख 10 लोकांमध्ये सात उद्योगपती अमेरिकेचे आहेत. या यादीत एकमेव अंबानी आशियातील आहेत. प्रमुख दहा श्रीमंतांमध्ये फ्रान्स आणि स्पेनचा एक-एक उद्योगपती आहे.

फोर्ब्सच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक मुल्यवान कंपनीचे नेतृत्व करतात. अंबानी यांच्याकडे युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बेमधून बॅचलर ऑफ सायन्स इन इंजिनियरिंगची डिग्री आहे.