राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, ‘या’ 4 पक्षांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाईं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.

राज्यपालांना भेटणार : मुनगंटीवार

राज्यपालांनी सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळविणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही राज्यपालांना भेटून राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी करणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सरकार बरखास्त करा : आंबेडकर

महाविकास आघाडीचे सरकार हे चोरांचे आणि खून्यांचे सरकार दिसत आहे. सोमवारी (दि. 22) राज्यपालांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली आहे. भेटून आम्ही हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

आठवले अमित शहांना पत्र देणार

राज्यात कायदा सुवस्यवस्था बिघडल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीचे पत्र अमित शाह यांच्याकडे देणार आहे. गृहमंत्री देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करा : राज ठाकरे

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र हे गंभीर आहे. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. केंद्रीय तपास संस्थांमार्फत याची चौकशी करावी. त्यानंतर फटाक्यांच्या माळा लागतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.