भाजपच्या ‘या’ बंडखोर नेत्यास काँग्रेसची उमेदवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २ मार्च रोजी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या खासदार सावित्रीबाई फुले यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सावित्रीबाई फुले या उत्तर प्रदेशाच्या दलित नेत्या असून त्यांच्या भाजप सोडून जाण्याने भाजपने उत्तर प्रदेश मधील मोठा दलित चेहरा गमावला आहे असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. आता त्यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

सावित्रीबाई फुले यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भाजपला अखेरचा ‘जय श्रीराम’ घातला होता. त्यावेळी त्यांनी आपण कोणत्या पक्षात जाणार आहे हे मात्र जाहीर केले नव्हते. भाजप सोडण्याआधी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. भाजप समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच राम मंदिराचा मुद्दा भाजपला गरिबांना रोजगार देण्याहून महत्वाचा वाटतो असे सणसणित टोले सावित्रीबाई फुले यांनी भाजपला लगावले होते. तसेच भाजप सरकारच्या काळात दलितांवर हल्ले वाढल्याचे देखील सावित्रीबाई फुले यांनी म्हणले होते. त्यांनी भाजपवर अशी खरमरीत टीका केल्या नंतर दोन दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसमध्ये प्रवेश करते वेळी त्यांनी इथूनपुढे आपण भाजप मध्ये कधीच जाणार नाही असे हि म्हणले होते.

दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने काँग्रेसला उत्तर प्रदेशात दलित नेतृत्व मिळाले आहे. म्हणून ३० टक्क्यांच्या जवळपास दलित मते असणाऱ्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने दलित मतांची संजीवनी मिळाली आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांचा आगामी लोकसभा निवडणुकीतील विजय हा उत्तर प्रदेशात काँग्रेस राजकारणाची समीकरणे ठरवणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले लोकसभा निवडणूक जिंकणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.