पंकजा मुंडे, एकनाथ खडसे पक्ष सोडणार का ? चंद्रकांत पाटलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी या दोनही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली होती. मात्र यावर बोलताना भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मी त्यांची नाराजी ऐकून घेतली असून दोघेही पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले. उद्याच्या कार्यक्रमासाठी मला गोपीनाथ गडावरून निमंत्रण आहे आणि मी जात आहे असे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुळात पंकजा मुंडे यांना भाजपचेच बाळ कडू मिळाले असल्याने त्या भाजप सोडणार नाहीत या केवळ मीडियाने तयार केलेल्या बातम्या असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.

पोस्टरवरून पुन्हा कमळ गायब
गोपीनाथ मुंडे यांची जयंती परळीमध्ये गोपीनाथ गडावर मोठ्या उत्सहात साजरी केली जाणार आहे. याची तयारी देखील मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आलेली आहे. मात्र यावेळी संपूर्ण परळीत मुंडे समर्थकांनी पोस्टर लावायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या एकही पोस्टरवर भाजप किंवा कमळाचा उल्लेख नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आता उद्या होणाऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून देखील आपल्या नावात बदल करत भाजपचा उल्लेख टाळला होता तसेच कमळाचे चिन्ह देखील न वापरल्याने राजकीय वर्तुळात चर्च्यांना उधाण आले होते.

Visit : policenama.com