सूर्यग्रहणानंतर अंघोळ करावी लागते, पाणी पुरवठा नियमित करा ; भाजप नगरसेविकेची ‘अजब’ मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सूर्यग्रहण झाल्यानंतर लोकांना अंघोळ करावी लागते त्यामुळे गुरुवारी (दि.26) होणारं पाईपलाईन दुरुस्तीचे काम पुढे ढकला अशी अजब मागणी पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर यांनी केली आहे. गुरूवारी (दि.26) सूर्यग्रहण आहे, या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. ग्रहण काळात अनेक अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार सर्रास घडत असतात, त्यातच भाजप महिला नगरसेविकेने ही मागणी केल्याने महापालिकेत चर्चेला उधाण आले आहे.

मागील काही दिवसांपासून दर गुरूवारी संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद ठेवण्यात येतो. त्यातच बुधवारी अमावस्या आणि गुरूवारी असलेलं सूर्यग्रहण संपल्यावर लोकांना आंघोळीसाठी पाणी लागते असे खर्डेकर यांचे म्हणणं आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंजूश्री खर्डेकर यांनी महापौरांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी, 25 डिसेंबर रोजी दर्श अमावस्या असून दिनांक 26 डिसेंबर रोजी सूर्यग्रहण आहे. हिंदू धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार असल्याने गुरूवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरूस्ती करावी अशी आग्रही विनंती करत आहे, असे पत्र त्यांनी लिहले आहे. परंतु महापौरांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी आंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या अजब मागणीची पुण्यात जोरदार चर्चा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/