डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उध्दव ठाकरेंचं प्रेम ‘बेगडी’, BJP कडून मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यास उद्धव ठाकरे यांना वेळ नाही व त्यांचे बाबासाहेबांविषयीचे प्रेम बेगडी आहे अशी टीका भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास गेले नाहीत. तसेच महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून स्वतः बैठकही घेतली नाही. आता किमान महापरिनिर्वाणदिनाला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास जातील, अशी आशा गिरकर यांनी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी मंगळवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला केवळ मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते तर मुख्यमंत्र्यांनी आणि इतर आघाडीच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे गिरकर यांनी सांगितले. एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसोबत येऊन चैत्यभूमीला अभिवादन करण्याची परंपरा सुरु केली होती. अशी माहिती यावेळी गिरकर यांनी दिली.

राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तरी उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यास जातील, अशी अपेक्षा होती पण त्यांना त्यासाठी वेळ मिळालेला नाही. चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाणदिनाला लाखोंचा समुदाय जमा होतो. त्यांच्या व्यवस्थेसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गेल्या पाच वर्षांची परंपरा आहे. पण उद्धव ठाकरे मात्र बैठकीस गैरहजर राहिले असं भाई गिरकर यांनी सांगितले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 1978 साली चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते व त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीही चैत्यभूमीवर अभिवादनास गेलेले नाही असा आरोप देखील गिरकर यांनी यावेळी केला.

पंतप्रधानांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत जे कोणी भाजपचे मोठे नेते आहेत त्या सर्वांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कोणत्याही मंत्र्यांना शपथविधी नंतर यासाठी वेळ मिळाला नसल्याची खंत गिरकर यांनी व्यक्त केली आहे.