‘Corona चं संकट संपू द्या, ‘जलयुक्त शिवार’मुळं किती फायदा झाला त्याचं प्रदर्शन मांडतो’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्वकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. फडवणीस सध्या राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ठिकाणांचा दौरा करत असून यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच भरवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. अशा चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेकरताच काम करणार आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

उस्मानाबादमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जी काही चौकशी करायची असेल ती त्यांनी जरुर करावी. सर्व चौकशीला आपण सामोरे जाऊ. ही मंत्रालयात सह्या करुन टेंडर दिलेली कामं नाहीत. सहा लाख कामं झाली आहेत. सहा लाख कामं विकेंद्रीत पद्धतीनं झाली आहेत. जिल्हाधिकारी यांचे प्रमुख होते. त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, कृषी विभाग, जलसंधारण, वन विभागानं कामं केली आहेत. एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक पातळीवर टेंडर काढून ही कामं झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितल आहे.

700 तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये 700 तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत. सरकारी कामात एक टक्क्काही तक्रार येऊ नये, पण त्यात किमान पाच ते सात टक्के किमान असतात. जाणीवपूर्वक चौकशी लावली आहे. कोरोना संकट संपू द्या आम्ही प्रत्येक गावात, तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मतच नोंदवणार आहे. आमच्याकडे आधीपासून ते आहे देखील. अनेक शेतकऱ्यांनी काय फायदा झाला हे सांगितलं आहे. जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच मांडणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटल आहे.