सेनेला उपमुख्यमंत्रिपद व महत्वाची खाती देण्यास BJP तयार, आदित्य ठाकरेंसह ‘या’ 3 बडया नेत्यांच्या नावाची DyCM पदासाठी चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि इतर 2-3 महत्वाची खाती देण्याच्या मनस्थितीत सध्या भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

शिवसेनेला महत्वाच्या खात्यांपैकी महसूल खाते देण्यात येईल. मात्र गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. शिवसेनेने खुपच ओढाताण केल्यास शिवसेनेला न घेताच भाजपा सत्ता स्थापन करेल. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बहिष्कार टाकतील आणि एकदा का ठराव मंजूर झाली की नंतर 6 महिने ठराव आणता येणार नाही. त्या 6 महिन्याच्या काळात तोडफोडीच्या राजकारणाला चांगलीच गती येईल.

सद्यपरिस्थितीत आदित्य ठाकरे यांनी लागलीच उपमुख्यमंत्रिपद अथवा मंत्रीपद घेऊ नये असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यांच्याऐवजी ज्येष्ठत्वाचा मान राखत सुभाष देसाई अथवा एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी अशी देखील चर्चा आहे. त्यामध्ये पहिले अडीच वर्ष सुभाष देसाईंना उपमुख्यमंत्रिपद द्यावे आणि नंतरच्या अडीच वर्षात आदित्य ठाकरेंकडे ते सोपवावे असे बोलले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांचे देखील नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार हे निश्चित होणार आहे. आता फक्त राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या नावांची चर्चा आहे.

Visit : Policenama.com