‘मदिरालयं सुरू केली मात्र मंदिरं उघडत नाहीत, बाळासाहेबांच्या सुपुत्राकडून ही अपेक्षा नाही’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मदिरालयांची वेळ वाढवून देणारे सरकार मंदिरे मात्र एक तास सुद्धा उघडण्यास तयार नाही. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्या कार्यकाळात देव, देश आणि धर्माची काय अवस्था झाली आहे ? लोकमान्य टिळक असते तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल त्यांनी केला असता. असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात ‘बॅड गव्हर्नमेंट’ तर आहेच, पण ‘नो गव्हर्नमेंट’ अधिक आहे. सरकार दिसत नाही. कोविड सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेत. सरकारला जाब विचारला की लगेच मुख्यमंत्री, गृहमंत्री हे हा महाराष्ट्राचा अपमान असे म्हणतात. तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. सरकारची सध्याची कृतीच महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे फडणवीस यांनी सुनावले.

कोरोनाच्या काळात माणसे किड्या-मुंग्यासारखी मरत आहेत तरी देखील राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? सामान्य नागरिक आज आक्रोशीत आहे. डोळे मिटून दूध पिले, तरी जनतेला हा भ्रष्टाचार दिसतो आहे. कोरोनाच्या काळात आम्ही राजकारण केले नाही पण आता भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला.

राज्यात आज मराठा आरक्षणाबाबत संताप आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की, कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने आंदोलन करा. महाराष्ट्र पेटलेला मी अनुभवाला आहे, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी मराठा कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.