Satara News : ‘आम्ही गुलाब पुष्प तर NCP ने पैसे देऊन केले स्वागत’, सातार्‍याला आम्ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही – खा. गिरीश बापट

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट (Girish Bapat) रविवारी (दि. १० जानेवारी) सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी वार्ताहरांना बोलताना, साताऱ्याला आम्ही राष्ट्रवादीचा(NCP) बालेकिल्ला मानत नाही. आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. राष्ट्रवादीकडे पैसा असल्याने ते पैसे देऊन स्वागत करत असतील , असे म्हणत बापट यांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला.

बापट म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रभावीपणाने उतरली असून, अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते, सदस्य बिनविरुद्ध निवडून आले आहेत. आम्ही सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आमदार रोहित पवार यांनी बिनविरुद्ध ग्रामपंचायतींना पैसे देणार असल्याचे सांगितले, भाजपकडून काय देण्यात येणार असे विचारले असता त्यांनी म्हटलं, राष्ट्रवादीकडे पैसा आहे. म्हणून ते पैसा देऊन स्वागत करतात. आम्ही बिनविरुद्ध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो.

दरम्यान, राज्य सरकारने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या भाजपच्या बड्या नेत्यांची सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यावर बापट म्हणाले, देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही. कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे.