CM ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानाला नारायण राणेंकडून जोरदार ‘प्रत्युत्तर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर जोरदार प्रत्युत्तर देताना भाजप नेते नारायण राणे यांनी सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजप पाडेल, त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची गरज नसल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग इथं घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

रिफायनरी महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तर दोन गोष्टीचा विचार करावा. पैसा महत्त्वाचा की जनतेचं जीवन महत्त्वाचं ते ठरवावं. हिम्मत असेल तर रिफायनरी येणार नाही, असा ठराव उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये करावा, असे आव्हान नारायण राणे यांनी दिले. तसेच मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आस्था असेल तर ‘शिवाजीचे उदात्तीकरण’ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्यावर भाष्य करताना नारायण राणे म्हणाले, अशी चर्चा अधून मधून पुढे येत असते. भाजप शिवसेना एकत्र येणार हे मनोहर जोशींना विचारा असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील का हे जोशी सरच सांगू शकतील असे नारायण राणे यांनी सांगितले.