गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ विधानावरून वाद चिघळला, निलेश राणे म्हणाले – ‘मोदी साहेबांवर किती वेळा नाय नाय त्या…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका पत्रकार परिषेमध्ये बोलताना केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बहुजन समजावर अत्याचार करण्याची भूमिका कायम राहिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत, अशा शब्दांत पडळकर यांनी पवार यांना लक्ष केल्याचं दिसून आलं. दरम्यान, पडळकर यांच्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून, अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सुद्धा ट्विट करत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

निलेश राणे ट्विट मध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकवेळा घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. पण भाजपा आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोणी अंगावर जाणार असेल तर जशास तसे उत्तर देऊ हे लक्षात ठेवा, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

पडळकरांच्या विधानानंतर भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया –

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं आहे

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं की, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याशी पूर्णपणे असहमत आहे. शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी या भाषेत टीका करणं चुकीचं आहे. तसेच पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवरील वादग्रस्त विधानावर गोपीचंद पडळकरांची शाळा घेतली. गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाचं अधिकृत विधान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा शरद पवार, अशा पद्धतीने टीका करणं चुकीचं असल्याचं मत प्रवीण दरेकर यांनी मांडलं.

काय बोलले होते गोपीचंद पडळकर –

शरद पवार यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होत. पण विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र, या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्हाला यावरती बोलावं लागले, असं पडळकर म्हणाले. तर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना केलं.