…तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीची महापूजा का करावी ? भाजपा आ. गोपीचंद पडळकरांचा विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वादात कचाट्यात सापडलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, दरवर्षी परंपरेनुसार आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा केली जाते, मात्र यंदाची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पांडुरंगाची महापूजा करु नये, याबाबत पडळकर म्हणाले की, राज्याला सध्या कोरोनाला सामोरे जावे लागत आहे, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात बाहेरील लोकांना, महाराज मंडळींना प्रवेश नाही, तर मग ही महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी का करावी ? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी मुंबईतून पंढरपुरात येऊ नये, असं ते यावेळी म्हणाले. तसेच यंदाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना देण्याऐवजी सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास देण्यात यावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. यासोबतच त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणही साधला आहे. भाजप सरकारने धनगर समाजासाठी तरतूद केलेले १ हजार कोटी या सरकारनं दिले नाहीत, असा घणाघाती त्यांनी यावेळी केला.

शरद पवारांवरील टीकेमुळे वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर टीका करत, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं म्हंटल होत. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकरांविरोधी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी शरद पवारांची माफी मागावी, नाहीतर त्यांना राज्यभरात कुठेही फिरू देणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांना दिला.

यावर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणले कि, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाहीत. त्यामुळे अशी टीका करणे योग्य नाही. या संदर्भात मी पडळकरांशी बोललो आहे. त्यांनी भावनेच्या भरात हे विधान केल्याच मान्य केले आहे. ते लवकरच यावर स्पष्टीकरण देतील.तसेच जर मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी जायचं असेल तर त्यांना जाऊ दिलं पाहिजे. विठ्ठल हे आराध्य दैवत आहे. आम्ही त्यांना संपूर्ण आध्यात्मचा राजा म्हणतो. आणि मुख्यमंत्री प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे ही पूजा करणे मुख्यमंत्र्याचा मान नाही, तर कर्तव्य असल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.