‘या’ कारणामुळं राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना डोक्यावर घेतेय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी भाजप ( BJP) नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर हल्ला करत आहेत. मला भाजप सोडण्यास प्रवृत्त करणारे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणत एकनाथ खडसे फडणवीसांवर जोरदार हल्ले चढवत आहेत. त्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड ( Prasad Lad) यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत हल्ले करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना डोक्यावर घेत आहे. पण, खडसेंमुळं उत्तर महाराष्ट्रात भाजपचं काहीही नुकसान होणार नाही. खडसे इतक्या ताकदीचे नेते होते, तर स्वत:च्या मुलीला निवडून का आणू शकले नाहीत,’ असा बोचरा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.

खडसे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर खडसेंच्या पक्षांतरामुळं उत्तर महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतील, अशी चर्चा आहे. अशातच येत्या २० व २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांचा त्या भागातील हा पहिलाच दौरा आहे. त्या निमित्तानं खडसे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचीही चर्चा आहे. याबाबत प्रसाद लाड यांना विचारलं असता, खडसेंमुळं भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपला बसणाऱ्या फटक्याविषयी बोलताना लाड म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. भाजप सक्षम आहे. आमच्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. खडसेंचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना जे करायचं ते करू द्या,’ असं लाड म्हणाले. ‘शरद पवार हे मागील ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत. त्यांचे दौरे नवीन नाहीत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या दौऱ्याने भाजप कमजोर होईल हे मानण्याचे कारण नसल्याचेदेखील लाड यांनी यावेळी म्हटलं. त्यामुळं आता खडसे यांच्या वतीने काय प्रत्युतर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.