‘या’ २ विद्यमान खासदारांचा पत्ता कट, नवीन चेहऱ्यांना संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपकडून जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत राज्यातील १६ मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहिर केली. भाजपने उमेदवारी देताना दोन ठिकाणी बदल केले असून लातुरचे विद्यमान खासदार सुनील गायकवाड व नगरचे दिलीप गांधी या दोघांचा पत्ता कट केला आहे. त्यांच्या जागी सुधाकरराव शृंगारे आणि डॉ. सुजय विखे यांना संधी दिली आहे. तर १४ विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवून परत संधी दिली आहे.

१७ व्या लोकसभा निवडणूकीसाठी अहमदनगर आणि लातूर मतदारसंघातच भाजपने बदल केले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नुकतेच भाजपमध्ये आलेले सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कापण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ.सुजय विखे हे मागील दोन वर्षांपासून लोकसभेच्या निवडणूकीची तयारी करत असल्याची चर्चा आहे. कँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांना कँग्रेसमधून उमेदवारी मिळणे अशक्य बनले. त्यामुळे त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. कँग्रेसमधून भाजपमध्ये इन झालेले सुजय विखे यांना उमेदवारी दिली. १९९९ मध्ये पहिल्यांदा खासदार झालेले दिलीप गांधी यांचा पत्ता कापून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या गटात प्रचंड नाराजीचा सुर आहे.

लातूर मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कापून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठेकेदार सुधाकरराव शृंगारे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात राजकिय भुकंप झाला असल्याचे चित्र आहे. शृंगारे हे वडवळ – नागनाथ येथून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. ते पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना संधी दिल्याने सुनील गायकवाड गटातून नाराजीचा सुर उमटत आहे.

भाजपने देशभरात सर्वे केला असून विद्यमान खासदारांच्या कामाचा आढावा त्यातून घेण्यात आला आहे. राज्यात ४५ खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट युतीने ठेवलं आहे. त्यामुळे भाजपकडून राज्यात उमेदवार निश्चितीसाठी जनभावनांचा विचार करतच आपली ताकद वाढविण्यावर भर दिला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.