‘राफेलप्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारनं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वरे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या वतीनं पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून शेती वाचवा अभियान सुरू झालं आहे. या 3 दिवशीय अभियानाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत.

राहुल गांधी या मोहिमेदरम्यान स्वत: ट्रॅक्टर चालवत खेड्यांमधील शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. या ट्रॅक्टर रॅलीत हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेसच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ट्रॅक्टर उतरलेले दिसले. मात्र शेतकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आली. यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. राफेलप्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार असं राणे म्हणाले आहेत. निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले, “राफेलप्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते. शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या शेती वाचवा आंदोलनात, सभांमधून मात्र शेतकरी गायब !” असंही राणे म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या आंदोलनावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत. ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात असं त्या म्हणाल्या आहेत.