एकनाथ खडसेंचा भाजपमधील 40 वर्ष राजकीय प्रवास, सरपंच ते महसूल मंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे (eknath khadse) येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. खडसे हे जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे (BJP) एक वजनदार नेते होते. भाजपाचा राज्यामध्ये विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्ष नेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

2014 मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना (Shivsena) युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच खडसे नाराज होते. मागच्या काही वर्षापासून ते भाजपच्या सक्रीय राजकारणातुन बाजूला पडले होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

खडसेंचा राजकीय प्रवास (political journey)

– जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोठाडी गावात 2 सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला.
– एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
– त्यानंतर 1987 साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले.
-1989 मध्ये भाजपच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
– 1980 मध्ये भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओबीसी (OBC) नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली.
– महाराष्ट्रात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ-सिंचन ही खाती सांभाळली.
– नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2014 या काळात ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. प्रभावी वक्तृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे.
– पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी 3 जून 2016 रोजी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
– 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकीट दिले. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी रोहिणी खडसे यांचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला.
– 2019 पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली.