बंगालमध्ये भाजपचे सरकार आले, तर पोलिसांना बूट चाटायला लावू : भाजपचे नेते राजू बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  “राज्यातील पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. बंगालमध्ये भाजपचे सरकार आले, तर पोलिसांना बूट चाटायला लावू,” असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते राजू बॅनर्जी यांनी केले आहे.

मंगळवारी दुर्गापूरमध्ये भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असा आरोप करत एका रॅलीच आयोजन केलं होते. त्यावेळी जनतेला संबोधित करत असताना बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. तेव्हाच राजू बॅनर्जी म्हणाले, “सध्या पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे ते पाहा. राज्यात गुंडाराज असलेले तुम्हाला पाहिजे का? पोलीस कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार नाहीत. अशा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काय करायला हवे? आम्ही त्यांना बूट चाटायला लावू,” असे वादग्रस्त वक्तव्य बॅनर्जी यांनी पोलिसांबाबत काढले.

हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू; भाजप नेत्याची धमकी

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एका जाहीर सभेस संबोधित करताना म्हटलं की, “तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी नाही, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल. सुधारणा झाली नाही तर अशा कार्यकर्त्यांचे हात, पाय तोडू आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयात पाठवू. जर त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर थेट त्यांना स्मशानात पाठवू,” अशी धमकीच त्यांनी दिली होती. तदनंतर, मोठा वाद निर्माण झाला होता.