शिवसेनेचा ‘या’ जागेवर निवडणुक लढवण्यास दिला नकार

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने देऊ केलेली माढ्याची २३ वी जागा शिवसेनेने नाकारली आहे. माढा मतदार संघासाठी भाजपकडे उमेदवार नसल्याने ती जागा शिवसेनेला देऊ केली होती. मात्र, ही जागा शिवसेनेकडून नाकारण्यात आली आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मात्र, भाजपने त्यांना वेटिंगवर ठेवले आहे. या संदर्भात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीष महाजन यांची देखील भेट घेतली होती. पण मी वैयक्तिक कामासाठी महाजन यांची भेट घेतली असल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले होते.

रणजितसिंह भाजपात आले तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसेल. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माढा मतदारसंघातून लढणार नसल्याची घोषणा केली आहे. यानंतर राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी नश्चित मानली जात आहे. तरीही त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असेल तर राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

यातच आता भाजपकडून माढ्यात संजय शिंदे यांच्या नावाचाही विचार असल्याची चर्चा होती. संजय शिंदे यांनी मंगवारी रात्री महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संजय शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली.