‘मनसे’च्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचे ‘डोकं’, भाजप प्रवक्त्याचा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हे अधिवेशन होत आहे. या महाअधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. नव्या झेंड्यासोबतच मनसेचा हिंदुत्वाचा अजेंडा अधिक ठळक झाल्याचे दिसून येत आहे. मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापण्यात आली आहे. मनसेच्या बदललेल्या झेंड्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं डोकं असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे.

भाजपचे प्रवक्ते गणेश हाके म्हणाले, शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाली. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढून भाजपला मिळणाऱ्या हिंदू मतांच विभाजन करण्यासाठीच मनसेनं भूमिका बदलली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शरद पवारांची फूस असल्याचा अप्रत्यक्ष आरोप हाके यांनी केला आहे.

तसेच मनसेच्या बदलेल्या झेंड्यामागे वेगळंच राजकारण असल्याचेही हाके यांनी सांगितले. या सगळ्यामागे शरद पवारांचं डोकं आहे. सत्तेसाठी शिवसेना हिरवी झाली असून हिंदूची एकगठ्ठा मतं आता भाजपकडे जाऊ शकतात. याच मतांचे विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला असल्याचे हाके यांनी सांगितले. यामागे शरद पवार यांचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रोत्साहन दिल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी डाव आखला आहे. मात्र त्यांना यामध्ये यश येणार नसल्याचे हाके यांनी सांगितले. मनसेने झेंडा बदलला आहे, ते मतांसाठी भूमिका बदलतील. मात्र, खरा हिंदुत्ववादी कोण हे जनता ओळखते. त्यामुळे जनता त्यांच्या जाळ्यात फसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर मनसे-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा होती. यावर त्यांनी अशा पक्षाची आम्हाला गरज नसल्याचे सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –