राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही : मंगला कदम

अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्घाटने करून या कामांचे श्रेय घेण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही, अशी टिका माजी महापौर मंगलाताई कदम यांनी येथे केली. मतदारांनी विकास डोळ्यासमोर ठेवून पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठया मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर, शाहूनगर, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, इंदिरानगर, मोरवाडी, म्हाडा या भागात पत्रके वाटण्यात आली. तसेच मतदारांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक सुजित पाटील, युवा नेते कुशाग्र कदम, सतीश देशमुख, संजय बांदल, सनी डहाळे, जयश्री जाधव, अणू बांदल, प्रभाग क्र. 10 चे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सतीश सराटकर, नितीन नागूल, जॉन सेराव, निलेश नारखडे, अब्दूल शिकलगार, गणेश शर्मा, कल्पेश हरणे, संजय कलागते, नितीन भडके, संदीप चव्हाण, गोपीचंद जगताप, महादेव मुळे, कुशाग्र कदम युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

यावेळी माजी महापौर मंगलाताई कदम म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. धरणं भरली तरी यांचे नळ बंद आहेत. संभाजीनगर, शाहूनगर भागात नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना या शहरासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. मेट्रोच्या कामास राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे सरकार असतानाच मंजूरी मिळाली. भाजपने या शहरासाठी किती निधी आणला, असा सवाल कदम यांनी केला.

राज्यात व पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अजित पवार यांचे महापालिकेच्या कारभारावर लक्ष होते. भाजपचे मंत्री कितीदा शहरात आले. त्यांनी शहराच्या विकासासाठी कोणती पावले उचलली? कोणत्या मोठ्या योजना या शहरासाठी आणल्या? असा सवाल करत राष्ट्रवादीने केलेल्या कामांची उद्‌घाटने करण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही, असा आरोप कदम यांनी केला.

आरोग्य कर असतानाही भाजपने साठ रुपये कर संकलन शुल्क जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यास विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला, याची आठवण कदम यांनी करून दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like