भाजपच्या डावपेचात शिवसेना अडकणार ? अधिवेशनात होणार हिंदुत्वाची अग्निपरीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी असून, पूर्ण राज्यात भाजपाकडून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना आणि भाजपने केली आहे, परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सत्तेत असलेली सेना आणि काँग्रेस मध्ये सावरकर या मुद्द्यावर अनेक मतभेद आहेत.

ब्रिटिशांची ज्यांनी माफी मागितली त्यांना भारतरत्न का द्यायचा हा प्रश्न काँग्रेस नेहमी विचारते. काँग्रेसने नेहमीच सावरकरांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली आहे. महाराष्ट्र काँग्रेस चे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी ‘ मासिकात सावरकरांचा अपमान झाला असल्याचा आरोप भाजपने केला आहे, याबद्दल काँग्रसेने माफी मागण्याची मागणी भाजपने केली असून यावरती शिवसेनेने बोलणे टाळले आहे.

आज संपूर्ण राज्यात सावरकरांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून, आम्ही विधिमंडळात सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणण्याची मागणी सरकारकडे केली होती, ती मागणी सरकारने नाकारली. आज तरी शिवसेना हा प्रस्ताव आणणार का ही पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. सावरकरांवर शिवसेनेचे किती प्रेम आहे, की फक्त जनतेला फसवायचे काम सुरु आहे ते आज कळेलच, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यापूर्वी सुद्धा भाजपने काँग्रेसवर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप केलेला आहे. काँग्रेस नेहमीच राष्ट्रपुरुषांचा अपमान करत आली असून, शिदोरी मधून सुद्धा सावरकरांवर अत्यंत चुकीचे लिखाण झाले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.