गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाबाबत उदयनराजेंनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझे मत मी परखंडपणे मांडत असतो, असे सांगत पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांचे शरद पवारांशी फार चांगले संबंध होते. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

उदयनराजे भोसले यांनी काल सातारा जिल्हा बँकेत जाऊन बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आले असता, कोणी कोणाबद्दल काय बोलले ते मला विचारून बोलले नाहीत. माझे मत मी परखंडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे, असे म्हटले होते.