राज्यात भाजपला मोठा धक्का ? राज्यसभा खासदारांसह काही आमदार सोडणार पक्ष ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि भाजपचा मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वात जास्त जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले.

आता भाजपमधील अंतर्गत वादाला सुरुवात झाल्याचे दिसून येते. आधीच एकनाथ खडसे यांनी भाजपवर आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपमधील नाराजांच्या संख्येत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यसभेतील खासदारासह अनेक आमदार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीआधी भाजपने इतर पक्षातील नेत्यांना पक्षात स्थान देऊन मेगाभरती केली होती. मात्र भाजपचे सरकार येऊ न शकल्याने सर्वच आयाराम सध्या नाराज असल्याचे समजते. त्यामुळे हे नाराज आमदारांना पुन्हा आपल्या मूळ पक्षात येण्याचे वेध लागले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचे तीन पक्षांचे आमदार सांभाळणेच अवघड जात असल्याने अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप भाजपचे आशिष शेलार यांनी केला आहे. तिकडे एकनाथ खडसे यांनी भाजप ओबीसी नेत्यांना डावलत असल्याचे सांगत भाजपला घरचा आहेर दिला होता.

मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील ५ आणि आणखी ४ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी देखील या आमदारांनी दर्शवल्याचे समजते. मात्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.

भाजपवर नाराज असलेला एक खासदार शरद पवारांच्या निर्णयावर राजीनामा द्यायला तयार असल्याची माहिती देखील समोर येते. तसेच पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या जवळचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.