उत्तर प्रदेशमध्ये भाजपला दणका बसणार, काॅंग्रेसचा विजय होणार : प्रियंका गांधी

रायबरेली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान संपले असले तरी इतर राज्यात मात्र अजूनही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यंदा भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध काँग्रेस आणि महाआघाडी असा सामाना रंगतो आहे. अशातच राहुल गांधी यांची बहिण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. रायबरेली येथील बागोला येथे काँग्रेसच्या समर्थकांची त्यांनी आज भेट घेतली यावेळी बोलताना ‘उत्तर प्रदेशात भाजपला मोठा झटका बसेल’ असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “उत्तर प्रदेशात भाजपला मोठा झटका बसेल. त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागेल. ज्याठिकाणी काँग्रेसचे तागडे उमेदवार आहेत ते जोरदार टक्कर देतील. काँग्रेस विजयी होईल. जिथे आमचे उमेदवार थोडे हलके आहेत. तिथे मात्र आम्ही असे उमेदवार दिले आहेत जे भाजपची मतं कापतील” असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.

प्रियंका यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण

प्रियांका गांधीं यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. सध्या प्रियंका गांधी प्रचारामध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या अचणीत मात्र वाढ झाली आहे. त्यांच्या नागरिकत्वावरून गृहमंत्रालयाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत देखील प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल यांची पाठराखण केली आहे.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरून सध्या चर्चेला उधाण आले आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली. याबाबत आता प्रियंका गांधी यांनी भाऊ राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. “राहुल गांधी हे हिंदुस्थानी आहेत हे सगळ्या देशाला ठाऊक आहे. राहुल याच देशात जन्माला आला इथेच लहानाचा मोठा झाला. असं असतानाही भाजपाचे नेते बकवास करत आहेत” असं राहुल गांधी यांची बहिण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हंटलं आहे.